मोदींच्या ‘ड्रीम स्कीम’मुळे बँका बुडतील, रघुराम राजन यांचा इशारा

modi-rajan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ड्रीम स्कीम’ना लाल कंदील दाखवत सावधानतेचा इशारा दिला आहे. मुद्रा लोन, किसान क्रेडिट कार्ड सारख्या मोदी सरकारच्या अनेक योजनांमुळे बँकामधील कर्जाची थकबाकी (एनपीए) वाढण्याची शक्यता असून बँकाची स्थिती आणखी बिघडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. एका संसदीय समितीसमोर स्पष्टीकरण देताना त्यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.

आजतकच्या वृत्तानुसार लोकसभेच्या एका समितीने रघुराम राजन यांना नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए)वर आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. त्यात लिखित स्वरुपात उत्तर देताना एनपीएसाठी यूपीए सरकारच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवणाऱ्या राजन यांनी मोदी सरकार देखील क्लिन चीट दिलेली नाही. आपल्या मुद्देसूद उत्तरात त्यांनी मोदी सरकारच्या ‘ड्रीम स्कीम’वर भिती व्यक्त केली आहे.

सरकारने भविष्यात अर्थव्यवस्थेला आणि बँकांना संकटात आणू शकतील अशा स्त्रोतांवर लक्षं देणं गरजेचं आहे. विशेषकरून सरकारने महत्वाकांक्षी कर्ज योजना किंवा कर्ज माफीपासून वाचले पाहिजे, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. त्यांनी मुद्रा लोन, किसान क्रेडिट, एमएसएई क्रेडिट गॅरेंटी अशा योजनांना एनपीए वाढवणारे नवे स्त्रोत असे म्हटले आहे. मुद्रा लोन, किसान क्रेडिट लोकप्रिय योजना असल्यातरी कर्ज थकबाकीची जोखीम लक्षात घेता त्याचा योग्य अभ्यास आणि निरीक्षण केलं पाहिजे. तसेच सेबीद्वारे चालवण्यात येणारी एमएसएमई क्रेडिट गॅरेंटी स्कीम (CGTMSE)मध्ये देखील थकबाकी वाढत आहे आणि त्यावर तात्काळ लक्ष देऊन पाऊलं उचलण्याची आवश्यकता आहे, असेही राजन यांनी म्हटले आहे.