स्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला


सामना प्रतिनिधी, पुणे

केवळ मिळणाऱ्या 25 गुणांच्या उद्देशाने खेळात सहभागी होऊ नका. खेळ निःस्वार्थ वृत्तीने खेळा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड द्या. यश आपोआप तुमच्या पायावर लोळण घेईल. माझ्या देशाचा झेंडा मला सर्वांत वर जाताना बघायचाय हे ध्येय उराशी बाळगा. स्वार्थासाठी खेळाची निवड केली तर क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडणार नाही, असा सल्ला हिंदुस्थानची सुवर्णकन्या आणि महाराष्ट्राची आघाडीची नेमबाज राही सरनोबत हिने युवा खेळाडूंना दिला.

…म्हणून आम्ही यशाची फळे चाखतोय!
अंजली भागवतसारख्या ख्यातनाम नेमबाजांनी खूप संघर्ष करून या खेळात नाव कमावले. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा रस्ता सोयीचा आणि सोपा झाला. त्यांनी संघर्ष केला म्हणून आम्ही आज यशाची फळे चाखतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे माझ्या नेमबाजी कारकीर्दीच्या यशात अंजली भागवत यांचेही श्रेय आहेच. शूटिंगमधील आम्हा दोघींचा प्रकार वेगळा असला तरी अंजली भागवत यांना शूटिंग रेंजवर वावरताना पाहूनही मला बरेच काही शिकायला मिळाले, अशी प्रांजळ कबुलीही राहीने दिली.

सत्काराने भारावली
जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज राही सरनोबत हिचा शांतिदूत प्रॉडक्शन्स व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सत्कार करण्यात आला. कर्मभूमीतील या अनोख्या सत्कार समारंभाने सुवर्णकन्या अक्षरशः भारावून गेली. मॉडर्न हायस्कूलच्या मुलींचा मंत्रमुग्ध करणारा नृत्याविष्कार… तिरंगा ध्वजाच्या साक्षीने व्यासपीठावर आलेली राही सरनोबत… सिंधुताई सपकाळ यांनी पाठविलेल्या व्हिडीओ क्लिपमधील हृदयस्पर्शी कौतुकाची थाप… आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या प्रेरणादायी आणि चित्रपट लेखक दिग्दर्शक समृद्धी जाधव यांच्या स्फूर्तिदायी भाषणांनी या गौरव समारंभाला ‘चार चाँद’ लावले.

महापौर मुक्ता टिळक, विधान परिषद सचिव उत्तमसिंग चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, मोहन राठोड यांनीही राहीचे कौतुक केले. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिरीन सय्यद यांच्या जबरदस्त सूत्रसंचालनाने या सत्कार समारंभाची शोभा वाढविली. ‘माझ्या नेमबाजीच्या कारकीर्दीची जडणघडण पुण्यातच झाली. त्यामुळे माझी जन्मभूमी कोल्हापूर असली, तर कर्मभूमी पुणे होय. कर्मभूमीतील या अनोख्या सत्कार समारंभाने आपण भारावून गेलो आहोत’, अशी कृतज्ञता राही सरनोबत हिने सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. राहीचे वडील जीवन सरनोबत व आई प्रभा हेही आपल्या लेकीचा कौतुक सोहळा व्यासपीठावरून डोळय़ांत साठवत होते. आयएमए, हडपसर व युनिव्हर्सल आयकॉन, कोथरूड यांच्या सहकार्याने या गौरव सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते.

पुनरावृत्तीसाठी साधना, तपश्चर्येची गरज
तुम्ही बंदूक हातात घ्या अन् लक्ष्य साधा. कदाचित तुम्ही सहजपणे अचूक लक्ष्य साधाल. मात्र त्या अचूक लक्ष्याची पुनरावृत्ती करणे फार अवघड गोष्ट असते. यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी मोठी साधना, कठोर तपश्चर्या करावी लागते, मेहनत व सराव करावा लागतो, शरीरावर आणि मनावर ताबा ठेवावा लागतो. तुम्ही सहजपणे साधलेल्या अचूक लक्ष्याचा क्षण आठवा. त्यावेळी तुमची पोजिशन, तुमचा श्वास आणि एकाग्रता कशी होती? त्याचे स्मरण करा. हेच नेमबाजी या क्रीडाप्रकाराचे मूळ आहे, अशी स्वानुभवाची माहिती गोल्डन गर्ल राहीने दिली.

आता ऑलिम्पिक पदक हे ध्येय
क्रीडाविश्वातील सर्वोच्च ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणे हे कुठल्याही खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे सहाजिकच माझाही फोकस 2020च्या टोकियो ऑलिम्पिकवर आहे. मात्र, ऑलिम्पिक पदक मिळविणे हे नुसते माझे स्वप्न नाही, तर ध्येय आहे. स्वप्ने ही झोपेत पडत असतात आणि ध्येयासाठी आपण झपाटलेलो असतो. त्यामुळे ऑलिम्पिक पदक मिळविणे हे माझे ध्येय असल्याचा निर्धारही राहीने बोलून दाखवला.

summary- rahi sarnobat came back to india