टीम इंडियाचे गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्यास सक्षम – राहुल द्रविड

57

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदाच्या इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयसीसी वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाचे गोलंदाज नक्कीच प्रभाव पाडतील. कारण कोणत्याही खेळपट्टीवर विकेट काढण्याची क्षमता आपल्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या गोलंदाजांत आहे असा विश्वास हिंदुस्थानचे महान फलंदाज आणि ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे. इंग्लंडमधील विश्वचषकात बहुतांश लढती या हाय स्कोअरिंग होतील असेही मत द्रविड यांनी बोलून दाखवले.

राहुल द्रविड हे हिंदुस्थानच्या अंडर 19 संघाचे प्रशिक्षक आहेत, पण त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर टीम इंडियाने देश-विदेशात अनेक पराक्रम नोंदवले आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पडघम वाजू लागले असताना द्रविड यांनी या स्पर्धेत उतरणाऱ्या हिंदुस्थानी संघावर स्तुतिसुमने उधळली आहेत. ते म्हणाले, मी युवा हिंदुस्थानी संघाला घेऊन गेल्या वर्षी इंग्लंडला गेलो होतो. तेथील खेळपट्टय़ांवर फलंदाजांनी बहुतांश लढतीत मोठय़ा धावसंख्या उभारल्या होत्या. तिथे जो संघ मर्यादित षटकांच्या लढतीत मिडल ओव्हर्समध्ये जो संघ विकेट काढू शकतो तोच डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव आणू शकतो. टीम इंडियाच्या गोलंदाजांत नक्कीच ती क्षमता आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात हिंदुस्थानी संघ चमकदार कामगिरी करील असा मला विश्वास आहे. वन डे क्रिकेटमध्ये गेल्या वर्षभरात हिंदुस्थानी गोलंदाजांचा विकेट मिळवण्यात आघाडीवर आहेत. त्याचाच लाभ या विश्वचषकात आपल्या संघाला मिळेल असा विश्वासही द्रविड यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थानी गोलंदाजांनी गेल्या वर्षभरात 27 वन डे लढतीत सर्वाधिक म्हणजे 202 विकेट पटकावल्या आहेत. त्यापाठोपाठ 21 लढतींत 169 विकेट मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानी तर 24 लढतींत 140 विकेट घेणारा पाकिस्तानी संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट, धोनीची उपस्थिती ही संघासाठी मोठी जमेची बाजू
कर्णधार विराट कोहली आणि ज्येष्ठ यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी या सुपरस्टार्सची संघातील उपस्थिती हीच टीम इंडियासाठीची मोठी जमेची बाजू म्हणायला हवी असे सांगून द्रविड म्हणाले, संघ सहकाऱ्यांना पूर्ण सकारात्मक पाठिंबा देणारा कर्णधार म्हणून विराट कोहली जगात सर्वोत्तम ठरत आहे. शिवाय मैदानातील त्याची तडफदार कामगिरी अन्य क्रिकेटपटूंना चमकदार खेळ करण्याची प्रेरणा देते. तर दबाव कितीही मोठा असला तरी अखेरच्या क्षणापर्यंत यशासाठी कसा संघर्ष करायचा हे ज्येष्ठ यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून शिकावे, असेही द्रविड म्हणाले.

एका वर्षात वन डेत सर्वाधिक विकेट घेणारे संघ
संघ / लढती / विकेट
हिंदुस्थान 27 / 202
दक्षिण आफ्रिका-21 / 169
इंग्लंड 24 / 151
ऑस्ट्रेलिया 21 / 143
बांगलादेश 22 / 142
पाकिस्तान 27 / 140
श्रीलंका 20 / 116
वेस्ट इंडीज 21 / 109
न्यूझीलंड 14 /  106
अफगाणिस्तान -14 / 98

आपली प्रतिक्रिया द्या