पांड्या राहुलच्या व्हिडीओनंतर, राहुल द्रविडचा व्हिडीओ व्हायरल


सामना ऑनलाईन । बंगळुरू

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्याच्यावर टीका होत असतानाच आता द वॉल राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुणी द्रविडला लग्नाची मागणी घालताना दिसत असून तो तिला नकार देत आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर टीका केली असून त्याला द्रविडकडून सभ्यतेचे धडे घेण्याचा सल्ला दिला आहे.

एमटीव्ही वरील बकरा या कार्यक्रमातील राहुल द्रविडचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एमटीव्हीची एक व्हिजे राहुल द्रविडची मुलाखत घेत असते. मुलाखत संपल्यानंतर ती द्रविडच्या बाजूला येऊन बसते व त्याला लग्नाची मागणी घालते. तिची ही मागणी ऐकून राहुल द्रविड गोंधळतो व तिथून जायचा प्रयत्न करतो. नंतर तो त्या मुलीच्या वडिलांना समजवतो की हिचे हे लग्नाचे वय नाही तर हिला अभ्यासात लक्ष घालायला सांगा.