“नमो अॅपमधून नागरिकांचा डेटा चोरी होत आहे”

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबूकचं डेटा लिक प्रकरण ताजं असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ‘नमो’ अॅपमधून हिंदुस्थानी नागरिकांची माहिती चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. यासंबधीचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी हिंदुस्थानचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अॅपवर (नमो) साईन इन करता, त्यानंतर तुमची सर्व माहिती मी माझ्या मित्रांना (अमेरिकी कंपन्यांना) देतो.’

राहुल गांधी यांनी फ्रेंच रिसर्चर एल्डरसन यांच्या माहितीच्या आधारावर हा आरोप केला आहे. फ्रेंच रिसर्चर एल्डरसनने आरोप केला होता की, नरेंद्र मोदी अॅप ज्यांनी डाऊनलोड केला आहे त्यांची माहिती अमेरिकन कंपनी ‘क्लीवर टॅप’ला दिली जाते.

राहुल गांधी यांच्या ट्वीटनंतर भाजपने म्हटलं की, काँग्रेस अध्यक्षांना तांत्रिक बाबींची माहिती नाही. असे आरोप करून राहुल गांधी आणि काँग्रेस कँब्रिज एनालिटिका डेटा चोरी प्रकरणातून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. या अॅपच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांसोबत संवाद साधतात. भाजपने गेल्या आठवड्यात काँग्रेसवर आरोप केला होता की, गुजरात निवडणुकीत प्रभाव पाडण्यासाठी ब्रिटिश एनालिटिकाची मदत घेतली होती. सरकारने फेसबूक यूजर्सच्या डेटा चोरीप्रकरणी कँब्रिज एनालिटिका कंपनीला नोटीस पाठवून ३१ मार्चपर्यंत उत्तर मागितलं आहे.