राहुल गांधी ख्रिश्चनच, घरात चर्च बांधल्याचा स्वामींचा दावा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉंग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपला धर्म लपवत आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला असून राहुल यांनी नवी दिल्लीतील १० जनपथ येथील निवासस्थानात चर्चही बनवले आहे असा गौप्यस्फोट केला आहे. राहुल गांधी काही दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तेथील विविध मंदिरांना भेटी देऊन पूजा-अर्चा केल्या. यापार्श्वभूमीवर बोलताना स्वामींनी राहुल यांना लक्ष्य केले आहे.

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी २५ सप्टेंबरला गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी द्वारकाधिश मंदिरात जाऊन पूजा करुन पक्षाच्या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी गुजरातमध्ये खुल्या जीपमधून रोड शो करण्याची त्यांची योजना होती. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. मात्र बैलगाडी यात्रेस परवानगी दिली. त्यानंतर कॉंग्रेस उपाध्यक्षांनी जामनगरमधील सराफा बाजारातील व्यापाऱ्यांचीही भेट घेतली. त्यांनतर मंगळवारी सकाळी ते गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या सौराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या राजकोटला गेले. बुधवारी सुरेंद्रनगर येथील पर्वतीय भागात असलेल्या प्रसिद्ध चोटिला मंदिराचं जाऊन दर्शन घेतलं. आपल्या या दौऱ्यात राहुल यांनी आपण धार्मिक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.