आमचे सरकार एका व्यक्तीचे नसून सर्व देशाचे असेल: राहूल गांधी

rahul-gandhi

सामना प्रतिनिधी । नांदेड

येत्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात परिवर्तन होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर येणार आहे आणि हे सरकार केवळ एका व्यक्तीचे नसून सर्व देशाचे सरकार राहणार आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज नवामोंढा मैदानावर सांगितले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक चव्हाण, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

राहूल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, परंतू पाच वर्षात त्यांनी देशात 45 वर्षात नव्हती एवढी बेकारी निर्माण केली. नोटबंदीमुळे लाखो युवक बेरोजगार झाले. महिलांना नोटबंदीमुळे सर्वात जास्त त्रास झाला. याशिवाय मोदींनी नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी यांचे अब्जावधी रुपयांचे कर्ज माफ केले. त्यांना परदेशात पळून जाण्यासाठी वाट करुन दिली. मोदी स्वतःला चौकीदार समजतात, परंतू हा चौकीदार गरीबांचा नाही, शेतकर्‍यांचा नाही, मजूरांचा नाही.” तो अब्जावधी रुपयांचा गंडा घालून परदेशात जाणार्‍या श्रीमंतांचा चौकीदार आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल राहूल गांधींनी सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा करण्याआधी मी पक्षातील विचारवंतांना, अर्थतज्ज्ञांना विचारले की, देशातील सर्वात गरीब लोकांना आपण किती रुपये देऊ शकू, त्यावर अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, देशातील पाच कोटी कुटुंबांना महिन्यास प्रत्येकी सहा हजार असे वर्षाला ७२ हजार रुपये देऊ शकतो. आणि म्हणूनच आमच्या जाहीरनाम्यात आम्ही न्याय योजनेच्या शीर्षकाखाली गरीबातील गरीब माणसाला प्रत्येकी ७२ हजार रुपये वर्षाला देण्याची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.” मात्र हे पैसे घरातील महिलेच्या खात्यात जमा होतील, हेही त्यांनी सांगितले.