गांधी, नेहरू, आंबेडकर एनआरआय – राहुल गांधी

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबडेकर, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल हे सगळे एनआरआय अर्थात अनिवासी हिंदुस्थानी होते. काँग्रेस पक्षरुपी चळवळ या अशाच एनआरआय मंडळींनी एकत्र येऊन सुरू केली. या सगळ्यांनी हिंदुस्थान बाहेरच्या जगाचा अनुभव घेतला आणि मायदेशी परतल्यावर त्याचा वापर देशाच्या उभारणीसाठी केला; असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. ते अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘टाइम्स स्क्वेअर’ या ठिकाणी अनिवासी हिंदुस्थानींना संबोधित करत होते.

मिल्कमॅन मिस्टर कुरियन, सॅम पित्रोदा या एनआरआय मंडळींनी देशाला प्रगतीपथावर नेले. मात्र भाजपला असे वाटते की देशात काहीही घडले नाही. पण हे सत्य नाही असे राहुल गांधी म्हणाले. लघु आणि मध्यम स्वरुपाचे उद्योग सशक्त झाले तर रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील. मात्र सध्या देशातील वातावरण बरे नाही. सहिष्णुता हरवली आहे. अनेक लोक यामुळे चिंतेत आहेत. हिंदुस्थान असहिष्णू देश का झाला हा जगातील अनेक एनआरआय मंडळींनी पडलेला प्रश्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काही अर्थ नसल्याचे भाजप प्रवक्ते राम माधव म्हणाले.