Lok sabha 2019 मोदींच्या पावलावर पाऊल, राहुल गांधी 2 जागांवर लोकसभा लढणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींप्रमाणे दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राहुल गांधी तीन वेळा काँग्रेसचा बालेकिल्ला अमेठीमधून लोकसभेवर गेले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये अमेठीसह दक्षिण हिंदुस्थानातून राहुल गांधी निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवल्यास त्या भागामध्ये काँग्रेसच्या बाजुने वातावरण तयार होऊ शकते. दक्षिण हिंदुस्थानात काँग्रेसचे पारडे थोडे कमकुवत होत असल्याचे निदर्शनात आल्याने येथे राहुल यांना उतरवून काँग्रेस याची भरपाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षातील काही नेत्यांसह कार्यकर्त्यांना देखील राहुल यांनी दोन जागांवर निडवणूक लढवावी अशी मागणी केल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी अमेठीसह दक्षिण हिंदुस्थानातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. याआधी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातूनही राहुल गांधीचे नाव चर्चेत होते.

मोदींनी लढवली होती दोन जागांवर निवडणूक
2014 लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन जागांवर निवडणूक लढले होते. मोदींनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. याचमुळे राहुल यांनीही अमेठीसह आणखी एका जागेवर निवडणूक लढवण्याची मागणी काँग्रेसमधून होताना दिसत आहे.

सलग तीन वेळा खासदार
राहुल गांधी यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर 2004 ला पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली होती. यानंतर सलग तीन वेळा ते येथून खासदार म्हणून निवडून आले.