वैमानिकांच्या दिरंगाईमुळेच राहुल यांचे विमान धोक्यात सापडले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एप्रिल महिन्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात झालेल्या बिघाडाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. राहुल यांचे विमान हवेत हेलकावे खात होते. काही काळ चालकांना तांत्रिक दोष लक्षात आला नाही, पण विमानातील यंत्रणेकडून गंभीर धोक्याचा इशारा दिल्यावर वैमानिक जागे झाले. या विमानावर वेळीच नियंत्रण मिळवले नसते तर 20 सेकंदांमध्ये ते कोसळले असते असे उघड झाले आहे. वैमानिकाच्या मानवी चुकांमुळेच विमान धोक्यात सापडले होते असा ठपका नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने स्थापन केलेल्या एकसदस्यीय चौकशी समितीने वैमानिकांवर ठेवला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 26 एप्रिल रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीतून हुबळी येथे जाण्यासाठी निघाले. विमानात राहुल गांधींसह अन्य काही जण होते. या विमानात बिघाड झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी काँग्रेसने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडेही (डीजीसीए) तक्रार केली होती. डीजीसीएने या घटनेची सविस्तर चौकशी केली असून चौकशीतून उघड झालेली माहिती धक्कादायक आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राहुल गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता आणि त्यांच्या सुरक्षेबाबत खातरजमा करून घेतली होती.