मोदी देश सांभाळू शकत नसतील तर काँग्रेसकडे सत्ता द्या – राहुल गांधी

सामना ऑनलाईन । अमेठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सांभाळू शकत नसतील तर त्यांनी काँग्रेसकडे सत्ता द्यावी, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. मोदी यांनी देशाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. राहुल गांधी त्यांचा मतदारसंघ अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. तेथे जनतेशी संवाद साधताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

सत्तेवर येण्यापूर्वी मोदी यांनी दरवर्षी देशात दोन कोटी रोजगारनिर्मिती होईल असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आश्वासनाचे काय झाले? असा सवालही त्यांनी केला. दररोज ३० हजार तरुण रोजगारापासून वंचित असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी देश सांभाळू शकत नसतील तर त्यांनी काँग्रेसकडे सत्ता द्यावी. काँग्रेस सत्तेवर आल्यास सहा महिन्यांत सर्व सुरळीत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.