पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत नाही; माझी लढाई अयोग्य विचारधारेशी – राहूल गांधी

सामना ऑनलाईन । लंडन

आपण सध्या पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत नसल्याचे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सध्या याबाबत आपण विचार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता आपली लढाई देशातील अयोग्य विचारधारेशी आहे. यासाठीच सर्व लक्ष केंद्रीत केले असल्याचे ते म्हणाले. लंडनमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोशिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ट्रिपल तलाक आणि डोकलामबाबतच्या सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.

हिंदुस्थानचे पुढचे पंतप्रधान म्हणून तुम्ही स्वतःला बघता का असा सवाल पत्रकारांनी केला असता ते म्हणाले, मी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत नाही. त्याबाबत मी विचार केलेला नाही. देशातील एका विचारधारेशी आमची लढाई सुरू आहे. त्याचे नेतृत्व करण्याचा आणि त्यासाठी स्वतःला तयार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. २०१४ च्या निवडणुकानंतर माझ्यात हे बदल झाले आहेत. सध्या देशात ज्या घटना होत आहेत, त्यामुळे देशालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. मला देशाचे रक्षण करायचे आहे. त्यासाठी एका विचारधारेशी संघर्ष करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्ष ट्रिपल तलाक कायद्याच्या विरोधात नसून याला गुन्ह्याच्या कक्षेत सहभागी करण्यासाठी आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमच्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही, हा भाजपचा आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी सांगितले. डोकलाममध्ये चीनने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. चीन तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये चर्चेसाठी गेले. मात्र, डोकलामचा विषयही त्यांनी तेथे काढला नाही. डोकलाममधून चीनने सैन्य माघारी घेतल्याचा सरकारचा दावा फोल असल्याची टीकाही त्यांनी केली. सुषमा स्वराज या सक्षम मंत्री आहेत. मात्र, भाजपमध्ये त्यांची उपेक्षा होत असल्याचेही राहूल यांनी सांगितले.