न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद लोकशाहीतील दुर्दैवी घटना- राहुल गांधी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधा यांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीतील दुर्दैवी घटना आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीशांनी उपस्थित केलल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे .

ज्यांच्याकडे न्याय देण्याचं काम आहेत त्यांनीच अशाप्रकारे समोर येऊन व्यथा सांगावी हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. असे घडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच जस्टिस लोया मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी राहुल गांधीनी यावेळी केली.

आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्याच न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीशांनी समोर येऊन व्यथा सांगावी हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. असे घडणे हे लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर अशाप्रकारे टीका करण्याचा हा पहिलीच घटना आहे आणि हे सगळं लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीबाबत सरन्यायाधीशांना पत्र लिहिल्याची माहितीही न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेत दिली. या संपूर्ण घटनेमुळे देशभर एकच खळबळ माजली होती.