राफेलप्रकरणी केलेल्या वक्तव्याबाबत राहुल गांधींकडून खेद व्यक्त

1
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेलप्रकरणी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावली होती. त्या नोटीसला राहुल यांनी उत्तर दिले आहे. या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत निवडणूक प्रचाराच्या जोशात आपण असे वक्तव्य केल्याचे राहुल यांनी न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विपर्यास करत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निकालात वापरले नसलेले शब्द वापरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा गैरवापर करत जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमानना नोटीस बजावून नोटीसला उत्तर देण्यास सांगितले होते.

या नोटीसला राहुल गांधी यांनी उत्तर दिले असून आपण निवडणूक प्रचारात गुंतलो आहोत. त्या प्रचाराच्या जोशात आपण राफेलप्रकरणी वक्तव्य केले होते. त्याचा खेद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यातून न्यायालयाचा अवमान करण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, आता सर्वोच्च न्यायालायनेही स्पष्ट केले आहे, चौकीदार चोर आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने असे वक्तव्य केले नसल्याचे सांगत न्यायालयाकडून राहुल यांना अवमानना नोटीस बजावण्यात आली होती.