बेरोजगारीमुळेच मोदी आणि ट्रम्प सत्तेवर

सामना ऑनलाईन । प्रिन्सटन

बेरोजगारीची समस्या जगभर आहे. बेरोजगारांना रोजगाराचे आश्वासन देऊन हिंदुस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले आहेत. परंतु मोदी सरकार यात सपशेल अपयशी ठरले आहे अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी टीकास्त्र सोडले.

अमेरिकेच्या दौऱयावर आलेले राहुल गांधी यांनी प्रिन्सटन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गेल्या आठवडय़ात बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना राहुल गांधींनी हिंदुस्थानात भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका केली होती. बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नावर भाष्य करताना राहुल गांधींनी बेरोजगारीच्या समस्येमुळे हिंदुस्थानातील जनता काँग्रेसवर संतापली होती आणि त्यातूनच नरेंद्र मोदींचे सरकार आले अशी कबुलीही त्यांनी दिली.

राहुल गांधी काय म्हणाले

  • मोदी आणि ट्रम्प सत्तेवर येण्याचे प्रमुख कारण हिंदुस्थान आणि अमेरिकेतील बेरोजगारीचा प्रश्न हे आहे.
  • बेरोजगारी ही समस्या असल्याचे कोणी कबूल करीत नाही हीच आमची समस्या आहे.
  • हिंदुस्थानात बेरोजगारीमुळे लोकांमध्ये चीड निर्माण होत आहे. आम्हाला ती समजते, मात्र लोकशाही वातावरणात नोकऱयांची संख्या वाढविण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे मोठे आव्हान आहे.
  • नवे तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणामुळे आयटी क्षेत्रात नोकरकपात होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जॉब कोणाला आणि कोणत्या देशातील लोकांना मिळणार हा एक प्रश्न आहे.

मेक इन इंडियाफक्त बडय़ा उद्योगांसाठी

‘‘रोजगाराच्या समस्या अतिशय गंभीर आहेत. रोजगार देऊ शकत नसाल तर तुम्ही  व्हिजनदेखील देऊ शकत नाही. ‘मेक इन इंडिया’ फक्त बडय़ा उद्योगांसाठी आहे’’ अशी  टीका  मोदी सरकारवर करतानाच राहुल गांधींनी, ‘‘हो, ‘मेक इन इंडिया’ छोटय़ा उद्योगांसाठी राबविले पाहिजे’’ असे सांगितले.

हिंदुस्थानात दररोज ३० हजार नवे तरुण रोजगाराच्या शोधासाठी बाहेर पडतात, मात्र सरकार दिवसाला केवळ ५०० नोकऱया निर्माण करीत आहे. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत दररोज मोठी भर पडत आहे, असे राहुल गांधींनी सांगितले.