पुरे दम से लडेंगे!

1

सामना ऑनलाईन । लखनौ

काँग्रेस पक्ष बॅकफूट नाही तर फ्रंटफूटवर खेळणार. न घाबरता भाजपच्या विरुद्ध पुरे दम से लडेंगे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात केवळ लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लक्ष्य आहे. त्यासाठीच प्रियंका गांधी-वढेरा आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी आज लखनौ येथे रोड शो वेळी आणि काँग्रेस मुख्यालयात असे दोन वेळा भाषण केले. या वेळी ‘देश का चौकीदार’ असे विचारताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चोर हैं’ अशा घोषणा दिल्या. राहुल गांधी म्हणाले, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्याची जबाबदारी प्रियंका गांधी-वढेरा आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झाली पाहिजे; पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार बनले पाहिजे. काँग्रेस पक्ष एक इंचही मागे हटणार नाही. बॅकफूटवरून नाही तर फ्रंटफूटवरून लढेल. आपली लढाई भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेविरुद्ध आहे. पुरे दम से लडेंगे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील बसपा-सपा आघाडीचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले, मायावती, अखिलेश यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणार नाही. पण काँग्रेस पक्ष आपल्या विचारधारेसाठी जोरदार लढेल. या वेळी राहुल गांधींनी राफेल, बेरोजगारी, शेतकरी आदी मुद्दय़ांवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला केला.