मोदी कायम स्पीकर आणि फ्लाइट मोडवरच, राहुल गांधी यांचा चौफेर हल्ला

1

सामना ऑनलाईन । होसाकोटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोबाईल फोनसारखे आहे. ते बहुतांश ‘स्पीकर मोड’मध्येच असतात. ‘स्पीकर मोड’मध्ये नसले तर मग ‘फ्लाइट मोड’मध्ये असतात, पण ‘वर्क मोड’मध्ये कधीच नसतात अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदींवर येथे हल्ला चढवला.

मोदी हे हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेल्या रोहित वेमूलाबद्दल बोलू शकत नाहीत. कारण त्याच्या मृत्यूला त्यांचीच माणसे कारणीभूत आहेत. मोदी हे उन्नाव येथील बलात्कारावर बोलू शकत नाहीत. कारण तिथे भाजपचे लोक आरोपी आहेत. म्हणून पंतप्रधान माझ्यावर, सिद्धरामय्यांवर आणि मल्लाकार्जुन खरगेंवर बोलतात असे राहुल यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेलवर सरकार ‘जीएसटी’ का लावत नाही याचे कारण मोदी हे जनतेला का सांगत नाहीत असा सवाल करून राहुल गांधी म्हणाले की, त्यांना केवळ सामान्य जनतेचा पैसा ओरबाडून पाच-दहा उद्योगपतींच्या खिशात घालायचा आहे. जगभरात पेट्रोलचे भाव घसरत असताना आपल्या देशात मात्र त्याचे भाव वाढतच आहेत. पेट्रोलचा आंतरराष्ट्रीय दर एका बॅरलमागे १४० अमेरिकन डॉलर्स होता तो आता ७० डॉलर्सवर आला आहे. मग त्यातून वाचणारे लाखो कोटी रुपये जातात कुठे, असा सवाल त्यांनी केला.