लोकं मरत असताना पंतप्रधान मोदी… राहुल गांधी यांची सडकून टीका

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी राजस्थानमधील चुरू येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ”कोरोना काळात लोकं मरत असताना मोदी थाळी वाजवायला सांगत होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

”आम्ही गरिबांचे सरकार चालवतो, आम्ही जनतेचे रक्षण करतो. पण पंतप्रधान लोकांवर जीएसटीचा भार टाकतात, पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्याला जीएसटीच्या रुपात कर भरावा लागत आहे. त्यांनी नोटबंदी केली त्यामुळे अनेक छोटे छोटेव्यवसाय उद्ध्वस्त झाले. कोरोना काळात लोकं मरत असताना पंतप्रधान थाळ्या वाजवायला सांगत होते. पंतप्रधान मोदी आता पर्यंत फक्त आश्वासन देत आले आहेत. आता लोकं त्यांच्या आश्वासनांवर हसत आहेत. 15 लाख रुपये लोकांना मिळेल का?” असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

”मोदींनी दिलेला हमीभाव म्हणजे अदानींचा हमीभाव आणि आमचं सरकार म्हणजे शेतकरी व मजूरांचं सरकार आहे. तुम्हाला कोणतं सरकार हवं आहे. राजस्थान सरकारने जनतेसाठी खूप कामं केली आहेत. जर भाजप सत्तेवर आली तर लोकांसाठी केलेली काम उद्ध्वस्त करून श्रीमंतासाठी ते काम करतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.