राहुल गांधींच्या भाषणाची वाट लावणारा हा नेता कोण आहे ? वाचा सविस्तर

5

सामना ऑनलाईन, मुंबई

राहुल गांधी यांची 16 एप्रिल रोजी केरळमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये राहुल गांधी इंग्रजीतून भाषण करत असल्याने त्याचे भाषांतर करण्याची जबाबदारी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यावर सोपवण्यात आली होती. या नेत्याने राहुल गांधींच्या भाषणाची पूर्ण वाट लावली आणि स्वत:सह राहुल गांधींना पुन्हा एकदा ट्रोलकऱ्यांसमोर उभं केलं.

काँग्रेसच्या या नेत्याला राहुल गांधी काय बोलतायत हे काही कळत नव्हतं, तो वारंवार राहुल गांधींना ते काय बोलले हे विचारत होता.  बागेत मित्रांसोबत गप्पा मारताना कसे उभे राहतो  तसा हा माणूस राहुल गांधी यांच्यासमोर ठेवलेल्या मंचाला टेकून उभा होता.हा नेता भाषांतरासाठी वारंवार त्रास देत असल्याने राहुल गांधी यांनी मंचावरील इतर नेत्यांकडे दुसरा माणूस द्या अशी विनंतीही केली होती. यामुळे एक-दोघांनी काँग्रेस नेत्यासमोरचा माईक उचलून नेला. मात्र हा नेता त्याच्या जागेवरून हलला नाही,ज्यामुळे माईक पुन्हा त्याच्यासमोर ठेवला. भाषणादरम्यान या नेत्याने एकदा कहरच केला. स्वत:समोरचा माईक त्याने बाजूला ठेवला आणि घरात गप्पा मारतो तशा आविर्भावात बोलायला लागला. राहुल गांधींना अखेर त्याच्या तोंडासमोर माईक धरावा लागला.

राहुल गांधींची भर सभेत फजिती उडवणारा नेता आहेत तरी कोण असा अनेकांना प्रश्न पडला असेल. या नेत्याचे नाव पी.जे.कुरिअन असे असून काँग्रेस सरकारच्या काळात त्यांना राज्यसभेचे उपसभापतीपद देण्यात आले होते. त्यांनी केंद्रात मंत्रिपदही उपभोगलं असून ते 6 वेळा लोकसभेवर तर 1 वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते.  कुरिअन हे 78 वर्षांचे असून त्यांची खिल्ली उडवण्यापूर्वी त्यांच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता असं भाजपकडून या भाषांतराची खिल्ली उडवली गेल्यानंतर म्हटलं. यावर अनेकांनी काँग्रेसलाच झापलं असून तुम्हाला दुसरा चांगला, तरुण भाषांतरकार सापडला नाही का ? नसेल तर हे तुमचं अपयश आहे असं म्हटलं आहे.