राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील!

65

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील असे स्पष्ट विधान पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. बुधवारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर सुरजेवाला यांनी हे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत उलट-सुलट चर्चा रंगत होत्या. आता सुरजेवाला यांच्या या विधानामुळे चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

बुधवारी बैठकीनंतर बोलातना सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते, आहेत आणि राहतील यावर आमच्यापैकी कोणालाही संशय नाही. तसेच सुरजेवाला यांना राहुल गांधी यांचा पर्याय शोधला जात आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळले आणि हा अर्थहिन प्रश्न असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतल 15 गुरुद्वारा रकाबगंज रोडवरील पक्षाच्या वॉर रुममध्ये बैठक झाली. या बैठकीला अहमद पटेल, पी चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, आनंद शर्मा आणि रणदीप सुरजेवाला हजर होते. या बैठकीत महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आल्याचे सुरजेवाला म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या