राहुल गांधीच्या ‘या’ वागण्यावर अमित शहांचा निशाणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकारण करण्याची शैली लोकशाहीला धरून नसल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या संसदीय बैठकीत शहा यांनी ही टीका केली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत राफेल डीलवर काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली. त्यानुसार, अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधत म्हटलं की, राहुल गांधी यांची राजकारण करण्याची शैली लोकशाहीला धरून नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राफेल डीलमधील प्रमुख मुद्द्यांना यापूर्वीच मांडण्यात आलं आहे. पुन्हा पुन्हा तेच उगाळण्याने देशाचं भलं होणार आहे का? असा प्रश्न या बैठकीत अमित शहा यांनी उपस्थित केला.

राफेल डीलवरून काँग्रेसने भाजपला घेरलं असून या मुद्द्यावर बोलण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे लेखी नोटीस दिली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, सरकार ज्या प्रकारे विमानाच्या किमतीवर मूग गिळून गप्प बसले आहेत, त्यामुळे यात घोटाळा झाला असल्याचा संशय जास्त वाढला आहे.