तरुणाच्या जॅकेटवर शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने मरेपर्यंत मारहाण ?

सामना ऑनलाईन, पुणे

भीमा-कोरेगांव इथे घडलेल्या प्रकारानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राहुल फटांगडे असं या तरुणाचं नाव असून त्याचा इथे झालेल्या हिंसक प्रकाराशी काहीही संबंध नव्हता. त्याच्या जॅकेटवर शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने त्याला मरेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. राहुल हा दिवसभर घडलेल्या हिंसक घटनांनंतर त्याच्या सणसवाडीतील घरी परत जात असताना पेट्रोलपंपाजवळ त्याला एका टोळक्याने घेरलं, त्याच्या जॅकेटवर महाराजांचे चित्र असल्याने तो मराठा समाजाचा आहे असं समजून त्याला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली असं ग्रामस्थांनी सांगितल्याचं या वृत्तात म्हटले आहे.

राहुलच्या मृत्यूमुळे सणसवाडी हादरली आहे. “राहुल दंगलीत सहभागी नव्हता, मात्र जॅकेटवर महाराजांचे चित्र असल्याने त्याला घेरून बेदम मारहाण करण्यात आली” असं सणसवाडीतील ज्ञानेश्वर मेटगुळेंनी म्हटलं आहे. राहुलच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र सीताराम पारधे याने शिक्रापूर पोलिसांत तक्रार नोंदवली, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. राहुलला झालेली मारहाण ही संध्याकाळी साडेपाचच्या आसपास झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गॅरेज चालवणारा राहुल हा अत्यंत शांत, कोणत्याही भांडणात न पडणारा चांगला तरूण होता असं ग्रामस्थ सांगतायत. अशा तरुणाचा टोळक्याच्या मारहाणीत मृत्यू होणं हे सगळ्यांसाठीच अनाकलनीय आहे. राहुल हा त्याच्या आईसाठी मुख्य आधार होता. राहुलला दोन भाऊ असून एक भाऊ हा पोलिसांत काम करतो, तर दुसरा भाऊ शिक्षण पूर्ण करतोय.

  • Saipan Shaikh

    जय शिवराय जय भीमराय जय भारत जय संविधान