या आठवड्यात मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी

सामना ऑनलाईन । गांधीनगर

साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपला मोर्चा आता गुजरातकडे वळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसाचा दौरा करणार आहेत. ११ नोव्हेंबरपासून या दौराला गांधीनगरमधील चिलोडा येथून सुरुवात होणार आहे.

सौराष्ट्र, मध्य व दक्षिण गुजरात मध्ये रोड शो केल्यानंतर उत्तर गुजरातमधील धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर गुजरातमध्ये ३२ जागांपैकी १८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. ऑगस्टमध्ये आलेल्या पूरानंतर उत्तर गुजरातमध्ये बनासकाठा व पाटण जिल्ह्यात राहुल गांधी गेले असता त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता.

२०१५ मध्ये भाजपला प्रदेशातील बहुतांश स्थानिक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. ठाकोर सेना आणि ओ.एस.सी. (ओबीसी, एससी आणि एसटी) एकता मंचचे संस्थापक अल्पेश ठाकोर गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळे काँग्रेसला यावेळच्या निवडणुका जिंकण्याची आशा आहे. कारण उत्तर गुजरातमध्ये ठाकोरांचा व्यापक प्रभाव आहे.

गुजरातचे काँग्रेस अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी राहुल गांधी यांचा संपूर्ण दौरा कसा असेल हे लवकरच ठरवले जाईल असे सांगितले आहे. गुजरातच्या इतर तीन भागातील प्रचंड प्रतिसादानंतर राहुल गांधी आता ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर गुजरातचा दौरा करणार आहेत.