वसईत गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, साडेचार लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

सामना ऑनलाईन । वसई

पालघर पोलिसांनी अनधिकृत व्यावसाय आणि दारूच्या अड्यांवर धडक कारवाई रुरु केली आहे. वसई पूर्वेला मुंबई – अहमदाबाद महामार्गालगत असणाऱ्या माळजीपाडा येथील गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकला आहे. पोलिसाच्या छाप्यात 4 लाख 83 हजार 500 रुपये किमतीची दारू आणि दारू बनविण्यासाठी लागलारे सामान नष्ट केले आहे. वालीव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र हातभट्टी चालवणारा आरोपी नरेश पाटील पोलिसांच्या हातून निसटला आहे.

मालजीपाडा परिसरात खाडी किनाऱ्यालगत दलदल आणि झाडाझुडपामध्ये याच ठिकाणी राहणारा नरेश पाटील हा मोठ्या प्रमाणात हातभट्टी चालवत होता. या कारवाईत पोलिसांनी दारूने भरलेल्या 40 रबरी ट्यूब, 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिक चे 65 पंप, 6 लाकडी चाटु,अल्युमिनियम धातूचे 2 मोठे सतेले, 200 लिटर क्षमतेचे 185 ड्रम, प्रत्येक ड्रम मध्ये अंदाजे 200 लिटर नवसागर मिश्रित तयार गुळ वॉश गावठी हातभट्टी तयार करण्याचा, 32 लिटर गावठी दारूचे कॅन, प्लास्टिक चे पाणी ओढण्याचे पाईप, गावठी दारू बनविण्यासाठी लागणारी लाकूड असा एकुण 4 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल वालीव पोलिसांनी जप्त करून नष्ट केले आहे.