केंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश

सामना ऑनलाईन । मुंबई

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिह्यांचा केंद्राच्या नॅशनल सायक्लोन रिस्कमध्ये समावेश करण्यात आला आहे. या जिह्यांच्या समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये अंडरग्राऊड विद्युत लाइन टाकण्याकरिता राज्य सरकारने २०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. तसेच गावागावात विद्युत मॅनेजर नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथे महावितरण कंपनीच्या एल. टी. वायर जीर्ण झाल्याबद्दलचा तारांकित प्रश्न सुभाष पाटील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एल.टी. वायर बदलण्यासाठी दोन योजनांतून १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा काढण्यात आली असून महिनाभरात कंत्राटदाराने काम सुरू केले नाही तर कंत्राट रद्द केले जाईल, अशी माहिती बावनकूळे यांनी दिली.

तीन महिन्यांत विभागनिहाय समान पदे भरण्याचा आराखडा
महावितरण कंपनीच्या विद्युत केंद्र आणि विभागीय केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अतिरिक्त कर्मचारी असल्यामुळे सर्व विभागात समान कर्मचारी देण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. तीन महिन्यांत या आराखडय़ानुसार समान कर्मचारी नियुक्त केले जातील.