रेल्वेची बैलगाडीला धडक, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । अमरावती

भुसावळ – नरखेड पॅसेंजरने अमरावती जवळच्या रिद्धपुर येथे एका बैलगाडीला धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. शेख जमील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तसेच या अपघातात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास रिद्धपुर जवळ हा अपघात घडला.

शेख जमील हे बैलगाडीतून गावाकडे परतत होते. रेल्वे रुळ ओलांडतांना पॅसेंजरच्या वेगाचा अंदाज न आल्याने रेल्वेने बैलगाडीला जोरदार धडक दिली. धडकेत शेख जमील यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर खान तबरेज खान हा तरुण जखमी झाला. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही बैलांच्या शरिराचे तुकडे रेल्वेरुळावर विखुरले गेले होते. दरम्यान, अपघाताची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला याचा तपास करण्यात येत आहे.