सलग दोन रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड अध्यक्षांचा राजीनामा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सात दिवसात लागोपाठ दोन रेल्वे अपघातांच्या घटना घडल्याने रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सात दिवसात दोन रेल्वे अपघाताच्या घटना घडल्यामुळे रेल्वे मंत्रालयावर टीका होत आहे. दरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अद्यापपर्यत मित्तल यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही असे समजते.

२०१६ मध्येच मित्तल यांचा कार्यकाल संपला असून त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार मित्तल ३१ जुलै २०१८ पर्यंत पदावर कार्यरत असणे अपेक्षित होते. पण वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाल्याने रेल्वे मंत्रालयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पंतप्रधान कार्यालयाने या सगळ्यांची गंभीर दखल घेत संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासूनच रेल्वे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

दरम्यान उत्कल एक्स्प्रेस अपघाताची घटना जेव्हा घडली तेव्हा मित्तल स्वाईन फ्लूने आजारी होते व रजेवर होते. पण बुधवारी ते रेल भवनमध्ये आले व महत्वाची कामे उरकून त्यांनी प्रभू यांच्याकडे राजीनामा दिला.

आठवड्याभरात उत्तर प्रदेशमध्ये सलग दोन रेल्वे अपघात झालेत. बुधवारी पहाटे औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. त्यात ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्याआधी उत्तर प्रदेशमधील खतोली येथे उत्कल एक्स्प्रेस घसरल्याने २४ हून अधिक प्रवासी ठार व ५० जण जखमी झाले आहेत.