२९ कोटींचं मशीन शोधतंय उंदीर व घुशींची बिळं

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

रेल्वेरुळांखाली बिळं तयार करुन त्यात संसार थाटणाऱ्या उंदीर व घुशींनी सध्या रेल्वे प्रशासनाची झोपच उडवली आहे. बिळं करताना हे उंदीर व घुशी रुळांखालची माती भुसभुशीत करत असल्याने दरवर्षी रेल्वेला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. अनेक मार्गावरील रुळ जमिनीत धसू लागले आहेत. यामुळे उंदरांचा शोध घेण्यासाठी रेल्वेने तब्बल २९ कोटी रुपये खर्च करून रडार मशीन घेतलं आहे.

देशात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. याच जाळ्यांचा आधार घेत उंदीर व घुशींनी रेल्वेरुळांखाली बिळं तयार केली आहेत. यामुळे रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले हे रेल्वेमार्ग पोकळ झाले आहेत. पावसाळ्यात या बिळांमध्ये पाणी साठत असल्याने मोठ्या प्रमाणावर रुळांखालची माती वाहून जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या उंदीर व घुशींना शोधण्यासाठी रेल्वेने अत्याधुनिक तंत्राने सज्ज असलेली २९ कोटी रुपयांची एक रडार मशीन घेतली. रेल्वे ग्राऊंड पेंट्रीएशन रडार (जीपीआर) तंत्राचा वापर करत रुळांखालील उंदीर व घुशीं शोधून देण्याच काम ही मशीन करते. दिवसाला १६० किलोमीटर रेल्वेरुळांची व जमिनीखालची तपासणी ही मशिन करते. सध्या रेल्वेकडे अशा १६ रडार मशीन आहेत. या मशीनचा वापर करत उंदीर व घुशींना शोधून काढता येते.