‘जब वुई मेट’ आणि ट्रेनप्रवास!

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

‘जब वुई मेट’ हा माझ्या असंख्य आवडत्या चित्रपटांपैकी एक! दहा वर्षांपूर्वी ३१ डिसेंम्बरच्या रात्री तो बघत नवीन वर्षांचं स्वागत केलं होतं. त्या चित्रपटात करिना ट्रेन प्रवासाबद्दल म्हणते, ‘ये तो मेरा सेकंड होम है!’, आयुष्याचा अर्धाअधिक काळ ट्रेनप्रवास करण्यात जात असल्यामुळे बहुदा मला हा चित्रपट जास्त आवडला असावा.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच धावत ट्रेन पकडणारी करिना समस्त मुंबईकरांचे प्रतिनिधित्व करते आणि ट्रेन पकडल्या पकडल्या समोर असलेल्या अनोळखी माणसांना ‘जितं मया’ च्या आनंदात ‘आज तक मेरी एक ट्रेन नही छुटी माय गॉड!’ असं धापा टाकत टाकत सांगते. त्या क्षणापासून ती आपलीशी वाटू लागते. त्या चित्रपटात एकाही कलाकाराने अभिनय केलाय असे म्हणू शकत नाही. माझ्या मते ते सगळे जण आपापल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा जगले आहेत.
आपल्याला जशी चौथी सीट मिळाली, तरी हायसे वाटते, तशी करिनाला ‘पॅसेजवाली सीट’ मिळाली तरी धन्यता वाटते, नव्हे तर ती आरक्षणाच्या वेळी तशी मागूनच घेते. एकदा का आपण आपल्या जागेवर स्थानापन्न झालो, की आजू बाजूच्यांशी शिळोप्याच्या गप्पा मारू लागतो आणि तासभराच्या प्रवासात जवळीक वाढली, तर न मागताही सल्लेही देतो, तेच करिनाच्या बाबतीत होते. काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेला शाहिद तिची फुका बडबड निमूट ऐकतो आणि धीर संपला की डाफरतो. ट्रेनमधला गप्पांचा कोलाहल ऐकला की आपल्यातलाही शाहिद जागा होतो!

कोणी मागितली नसतानाही मदत करण्याची सवय आपल्याला कशी अंगाशी येते, हे करिना शाहिदला टीसीपासून वाचवण्यापासून ते त्याच्याशी बोलण्याच्या नादात ट्रेन सुटण्यापर्यंतच्या प्रवासातून लक्षात येते. स्टेशनमास्तरला गाऱ्हाणं घालावं, तर त्याचा सल्ला ऐकून आपल्यातही करिना शिरते. ”आप जो बोल रहे है, ये मुफ्त का ज्ञान है, या फिर इसके पैसे चार्ज करते है? क्यूंकी, चिल्लर नही है मेरे पास!” ”देखो बुड्ढे, ये मेरी प्रॉब्लेम है, में संभाल लुंगी, तुम फोन लगाओ, मेरा सामान उतारो और अपना काम करो!” भाग्यात असले तर आपले सामान आपल्याला मिळते, पण पुढची ट्रेन पकडण्यासाठी करावी लागणारी धावपळ, या प्लॅटफॉर्म वरून त्या प्लॅटफॉर्मवर धावणे, फास्ट ट्रेन पकडण्यासाठी प्रसंगी रिक्षा, बस, टॅक्सी चा आधार घेणे हा सगळा प्रवास करिनाने रतलाम स्टेशनपर्यँत केलाय, तो आपण रोजच करतो.

करीनाला स्टेशनपर्यंत सोडणारा टॅक्सीचालक आपल्यालाही रोज भेटतो. आधीच झालेला उशीर आणि त्याचे संथपणे गाडी हाकणे पाहून आपल्यालाही प्रश्न पडतो, ”ऐसे पकडेंगे हम ट्रेन? अरे भैय्या चलो, चलो, चलो,चलो,चलोssss!” असे आपणही मनातल्या मनात म्हणतो, पण तो ढिम्म, त्याला हव्या त्याच गतीने आपल्याला पोहोचवतो. मात्र एखाद दिवस शाहिदसारखाही रिक्षाचालक आपल्याला भेटतो, जो ट्रेनच्या वेळेआधी आपल्याला भरधाव वेगाने स्टेशनला पोहोचवतो. तरी आपण टंगळ-मंगळ करत बसलो आणि ट्रेन सुटली, तर ते आपलं दुर्दैव!

चित्रपटाच्या उत्तरार्धात नैराश्याने ग्रासलेली करिना आपल्याला दिसते. पुन्हा शाहिद तिच्या आयुष्यात येतो आणि तिला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी धावत धावत ट्रेन पकडायला लावतो. तेव्हा कुठे अबोल झालेली करिना बोलू लागते आणि म्हणते, ”गेल्या काही दिवसात मला खूप वाईट स्वप्न पडायची, की मी ट्रेन पकडण्यासाठी धावतेय पण माझी ट्रेनच सुटतेय!” ट्रेनप्रवासाला सरावलेल्या प्रवाशालाही बऱ्याच दिवसांनी ट्रेनप्रवास करताना हीच भावना असते. सुटीच्या दिवसात, नैराश्याच्या प्रसंगी, धावती ट्रेन, प्रचंड गर्दी आणि आपण पोहोचण्याआधी निघून गेलेल्या ट्रेन डोक्यात थैमान घालत राहतात. आयुष्य पुन्हा पटरीवर आणण्यासाठी जेव्हा पावले स्टेशनवर स्थिरावतात आणि ट्रेन पकडण्यासाठी हात रॉडकडे झेपावतातत, तेव्हा ”टाडांग टंग टननन” हे ‘जब वुई मेट’चे पार्श्वसंगीत मनात आपसूक वाजू लागते.

चित्रपटातील या सबंध ट्रेनप्रवासात स्टेशनमास्तरचा एक सल्ला फार मौलिक आहे, ‘जिंदगी रेल की पटरी है, दो इंच का बेंड और मिलोंकी दूरीsss’ तो लक्षात ठेवला, तर आयुष्यात सगळं काही ‘मौजा ही मौजा’ आहे! चित्रपटातल्या अंशुमनचे काय?? त्याने कधी ट्रेनप्रवास केलाच नाही, मग तो या चौकटीत येतच नाही, प्रश्न राहिला आदित्यचा, तर करीनाच्या भाषेत सांगायचे, तर तो कधी, कुठे आणि कसा भेटेल, ‘यू नेव्हर नो!’
आयुष्यभराच्या प्रवासासाठी, ट्रेन प्रवासासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!