गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वे नापास!

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेतून रेल्वेला दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळतो आहे. अनेक दशकांपासून हा महसूल मिळत असला तरी रेल्वे मंत्रालयाला आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे? हा प्रश्न काही सोडवता आलेला नाही. एल्फिन्स्टनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीतून तर गर्दीच्या व्यवस्थापनात रेल्वे नापास झाल्याचे ठळकपणे दिसून आले आहे.

बहुसंख्य महत्त्वाची सरकारी आणि खासगी कार्यालये मुंबई शहरात आहेत. त्यामुळे उपनगरांमध्ये राहणाऱ्या तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या अनेकांना रेल्वेतून धक्के खात प्रवास करावा लागतो. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर अनेक स्थानकांवर पहाटे पाच ते सकाळी १० आणि संध्याकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत प्रचंड गर्दी होते. शाळा, कॉलेज आणि ऑफिसांच्या वेळांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी असते. दिवसभरात अनेकदा बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर, परळ, कुर्ला यांसह अनेक स्थानकांच्या पादचारी पुलांवर जीव घुसमटून जावा अशी रेटारेटी सुरू असते.

गर्दी असलेल्या स्थानकांच्या प्रत्येक फलाटावर ३-४ पादचारी पूल असावेत अशी मागणी रेल्वे प्रवासी सातत्याने करत मात्र अनेक स्थानकांवर ही मागणी पूर्णच झालेली नाही. काही ठिकाणी २ पादचारी पूल असले तरी त्यातला १ पूल हा एकूण प्रवाशांपैकी १० टक्के प्रवासी पण वापरत नाहीत. काही ठिकाणी अरुंद, जुनाट पादचारी पूल आहेत. काही पुलांच्या पायऱ्या निसरड्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पादचारी पुलांवर दिवे नसल्यामुळे संध्याकाळपासून अंधार असतो तर काही पुलांवर पत्रा नसल्यामुळे दिवसा उन्हाचे चटके सोसावे लागतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेले पादचारी पूल हे त्यांच्यासाठीच त्रासदायक ठरत आहेत.

जागतिक महाशक्ती, बुलेट ट्रेन अशी मोठी स्वप्न बघणारे सरकार गर्दीच्या व्यवस्थापनासाठी काहीच करत नाही. त्यामुळे फेसबुक आणि ट्विटरवरुन संताप व्यक्त होणार, रेल्वे प्रशासन आश्वासन देणार आणि काही दिवसांनी सगळे शांत होणार अशा शब्दात आपला संताप काही बुजुर्ग रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

ट्वीटला प्रतिसाद

चेंगराचेंगरीमुळे मुंबईसह देशात रेल्वे विरोधात संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. हे वातावरण निवळावे म्हणून प्रवाशांच्या ट्वीटला तातडीने प्रतिसाद देण्याचे कार्य रेल्वेने हाती घेतले आहे. एका प्रवाशाने रेल्वेला उद्देशून बोरिवली, अंधेरी आणि दादरमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते अशा स्वरुपाचे ट्वीट केले. या ट्वीटला प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना बोरिवली, अंधेरी, ठाणे आणि दादर येथील पादचारी पुलांची पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.