डॉन को पकडना मुमकीन है! रेल्वे पोलिसांची आजपासून शोध मोहीम

55

मंगेश सौंदाळकर । मुंबई

डॉन को पकडना मुश्किल ही नही ना मुमकिन है अशा अविर्भावात वावरणार्‍या गुन्हेगारांची आता खैर नाही. कारण, रेल्वे पोलिसांनी क्रिमिनल सर्व्हिलन्स नावाचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. कानून के हाथ लंबे होते है असे म्हणत गुन्हेगारांचा माग काढला जाणार आहे. सोमवारपासून हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे.

मुंबईकरांची लाइफ लाइन असलेल्या लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातसफाई करतात. साधारणपणे रेल्वे पोलीस ठाण्यात दिवसाला 60-70 ( मोबाईल, बॅग चोरी, पाकीट चोरी) गुन्हे दाखल होतात. पोलीस तपास करून चोरटय़ांना गजाआड करतात. काही महिने तुरुंगाची हवा खाऊन आल्यावर चोरटे पुन्हा सक्रिय होतात. तर काही असेही चोरटे आहेत, जे पहिल्यांदाच चोरी करताना पडकले होते. त्यांची राहण्याची पद्धत आणि कपड्याचा पेहराव यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय येत नाही. लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. लोकलमधील गुन्हे यावर अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानुसार क्रिमिनल सर्व्हिलन्स नावाचा प्रोजेक्ट हाती घेण्याचे ठरले.

रेल्वेतील 17 पोलीस ठाण्यांत हा प्रोजेक्ट सोमवारपासून हाती घेतला जाणार आहे. क्रिमिनल सर्व्हिलन्सच्या माध्यमातून दिवसातून प्रत्येक दोन पोलीस कर्मचारी किमान दोन गुन्हेगार तपासणार आहेत. गुन्हेगारांना सतत तपासण्याची प्रकिया निरंतरपणे सुरू राहील.  – रवींद्र सेनगावकर, लोहमार्ग रेल्वे पोलीस आयुक्त.

गुन्हेगारांवर करडी नजर 

रेल्वे लोहमार्ग अंतर्गत 17 पोलीस ठाणी आहेत. पोलिसांनी किरकोळ, सराईत आणि हद्दपार केलेल्याचा डेटा तयार केला आहे. त्यानुसार पोलिसांना गुन्हेगाराची यादी दररोज मुख्यालयातून दिली जाईल. ते गुन्हेगाराच्या घरी जाऊन खात्री करतील. जर त्यांना तो मिळून आला नाही तर पोलीस ठाण्याचा डीबी स्टाफ जाऊन पुन्हा तपासणी करील. त्यांनाही गुन्हेगार सापडला नाही तर त्याचा शोध पोलीस ठाण्याचे अधिकारी घेतील. पोलीस अधिकार्‍यांनाही तो सापडला नाही तर ते काम गुन्हे शाखेकडे सोपवले जाणार आहे. मोहिमेदरम्यान जर एखादा गुन्हेगार मिळून आला तर सध्या काय करतो, त्याची माहिती फॉर्मवर भरून घेतली जाईल. त्याचा फोटो आणि लोकेशन घेतले जाईल. ते लोकेशन डेटा बेस मध्ये भरले जाईल. त्याचप्रमाणे गुन्हेगाराच्या नातेवाईकाचाही तपशील गोळा केला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या