रुळांना तडा गेल्याने हार्बर दीड तास विस्कळीत


सामना ऑनलाईन, मुंबई

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कॉटनग्रीन आणि रे रोड स्थानकाच्या दरम्यान डाऊन मार्गावर रुळाचा बारा इंचाचा तुकडा उडून रूळ तुटल्याने हार्बरची सेवा मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान दीड तास ठप्प झाली. ऐन उन्हाच्या तडाख्यात झालेल्या बिघाडाने मेन लाइनवर गर्दी वाढून प्रवासी अक्षरशः घामाघूम झाले. या गेंधळामुळे हार्बरचे अप आणि डाऊन असे दोन्ही मार्ग बंद पडल्याने ३० सेवा रद्द तर ४० फेऱयांना लेटमार्क लागला. हार्बर मार्गावर दुपारी १२.२५ वाजता कॉटनग्रीन ते रे रोडदरम्यान डाऊन दिशेच्या मार्गावर रूळाचा १० ते १२ इंचाचा तुकडा उडाल्याने रुळाचा सांधा तुटला. ही घटना मोटरमनच्या लक्षात येताच सीएसएमटी ते वडाळादरम्यानची गाडय़ांची वाहतूक बंद करण्यात आली. रे रोडचे स्टेशन मास्तर विनायक शेवाळे यांनी सूचना फलक लावून प्रवाशांना मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकातून प्रवास करण्याची विनंती केली. दीड तासाने ही वाहतूक सुरळीत झाली.