रेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याला मंजुरी

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिकरोड येथे रेल्वेच्या व्हील रिपेअरिंग कारखान्याला मंगळवारी केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी ५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

नाशिकरोड येथे १९८३ साली तत्कालीन रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी रेल्वे इंजिन कारखान्यासाठी अडीचशे एकर जागा दिली. या जागेवर कोणताही प्रकल्प उभारला गेला नाही.

ही आरक्षित जागा वापराविना पडून असल्याचे निदर्शनास आणून देत खासदार गोडसे यांनी तेथे रेल्वे व्हील रिपेअरिंगचा कारखाना व्हावा, यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घडवून आणल्या. सततच्या पाठपुराव्यानंतर आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या कारखान्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली.