इतिहासात प्रथमच पावसामुळे दोन लढती रद्द, हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीवर सावट

39

सामना ऑनलाईन, लंडन

इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा सर्वाधिक फटका बसताना दिसतोय. 1992 व 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये दोन-दोन लढती पावसामुळे रद्द झाल्या होत्या, मात्र यावेळी 2 लढती नाणेफेक न होताच पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या अन् पाऊस न उघडल्याने एका लढतीचा निकाल लागला नाही. श्रीलंका-बांगलादेश यांच्यामधील मंगळवारची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. गुरुवारी होणाऱया हिंदुस्थान-न्यूझीलंड लढतीसह बहुप्रतिक्षित हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीदरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. तसेच आता आणखी एक लढत पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाली तर वर्ल्ड कपमधील पावसाचा हा एक नवा विश्वविक्रमच ठरेल.

पाकिस्तान-श्रीलंका या संघांमधील ब्रिस्टॉलमधील लढत पावसामुळे नाणेफेकही न होता रद्द करावी लागली. उभय संघांना 1-1 गुण विभागून देण्यात आला. सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीजकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळवित आपण संपलेलो नाही हा इशारा क्रिकेटविश्वाला दिला. दुसरीकडे श्रीलंकेचाही सलामीच्या लढतीत दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानवर विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका लढत चुरशीची होणार असे वाटत असल्याने पावसामुळे या लढतीचा खेळखंडोबा झाला. याचबरोबर दक्षिण आफ्रिका व विंडीज या तुल्यबळ लढतीकडे क्रिकेटशौकिनांच्या नजरा लागल्या होत्या. विंडीजने 7.2 षटकांत आफ्रिकेची 2 बाद 29 अशी दुर्दशा केली असताना पावसाची बॅटिंग सुरू झाली. शेवटी ही लढतही रद्द झाली.

… तर चांगला संघही बाहेर जाईल

आता नॉटिंगहॅममध्ये होणाऱया हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यानच्या लढतीवर पावसाचे सावट असल्याने क्रिकेटप्रेमी चिंतातूर झाले आहेत. स्पर्धेत पुढे आणखीही काही लढती पावसामुळे रद्द होण्याची चिन्हे आहेत. या पावसामुळे एखादा चांगला संघ स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो किंवा एखाद्या खिजगणतीत नसलेल्या संघाला उपांत्य फेरीची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानला लागली होती लॉटरी

1992 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानचा 40.2 षटकांत अवघ्या 74 धावांत खुर्दा उडाला होता. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 8 षटकांत 1 बाद 24 धावसंख्येपर्यंत मजल मारली असताना पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ही लढत रद्द होऊन उभय संघांना 1-1 गुण विभागून देण्यात आला. हमखास हरणाऱया लढतीत पाकिस्तानला एक गुण मिळाला. या एका गुणाने ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट करून पाकिस्तानला उपांत्य फेरीची लॉटरी लागली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून पाकिस्तानने अंतिम फेरीत इंग्लंडवर विजय मिळवित जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. त्यामुळे यंदाही पावसाच्या खेळामुळे चांगल्या संघाचा गेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या