तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेडमध्ये श्रावणसरींचे आगमन

विजय जोशी, नांदेड

मागील तीन आठवड्यांपासून गायब झालेला पाऊस शनिवारी रात्री आणि रविवार सकाळपासून शहर आणि जिल्ह्यात रिमझिम ते मध्यम बरसत आहे. त्यामुळे श्रावणाने बहार केलीय, यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना बळीराजा सुखावला आहे. नांदेडमधील पाऊस आता थांबला असला तरी ग्रामीण भागात हा पाऊस रिमझिम सुरूच आहे. धर्माबाद, कुंडलवाडी, बिलोली परिसरात रात्री आणि आज सकाळी पाऊस झाल्याने उभ्या खरीपांच्या पिकांना जिवदान मीळाले आहे.

या भागात मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस पडल्याने पेरण्याही वेळेवर झाल्या होत्या. परिणामी लागेल तेव्हा आवश्यक तेव्हढाच पाऊस पडत गेल्याने खरिपाची पिके मोठ्या डौलाने वाढत गेली. मागील काही दिवस पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते. मात्र श्रावण मासाच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे. शिवाय श्रावणाच्या पावसाने सर्व पिकांवरील रोगराईही झडकून पडते अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.