विदर्भात वीज कोसळून ९ ठार

सामना प्रतिनिधी । नागपूर

परतीच्या पावसाने गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कहर केला. वीज पडून नऊ शेतमजुरांचा मृत्यू झाला. आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास यवतमाळात झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळल्याने पाच महिलांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच एकोडी येथे जिल्हा परिषद शाळेवर वीज कोसळल्याने चोवीस विद्यार्थ्यांना दुखापत झाली.

कळंब तालुक्‍यातील आमला येथील चंदा शंकरराव रामगडे (वय ४०), तेजस्विनी शंकरराव रामगडे (वय २१), मधुकर पुरुषोत्तम कुमरे (वय ३२) व निमगव्हाण येथील मंजुळा चंद्रभान राऊत (वय ६५) यांचा वीज पडून शेतात काम करीत असताना मृत्यू झाला. तर निमगव्हाण येथील सौमित्रा माणिक अंबाडेरे हिला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. यातील मधुकर कुमरे हे बैलांसाठी शेतातून चारा घेऊन येत होते, तर चंदा रामगडे व तेजस्विनी रामगडे या मायलेकी सीतादहीचा कापूस वेचत होत्या. राळेगाव तालुक्‍यातील खेमकुंड (सिंदेपोड) येथील सखूबाई एडकू आसोले (वय ४०) व त्यांची बहीणलेक सुरेखा विनायक शिंदे (वय ३३) वासुदेव शिंदे यांच्या शेतात कापूस वेचत होत्या. दरम्यान, वीज कोसळून सखूबाई जागीच ठार झाल्या; तर सुरेखा शिंदे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. तर निमगव्हाण येथील मंजुळा चंद्रभान राऊत (वय ६५) व त्यांच्यासोबत सौमित्रा माणिक अंबाडेरे (वय ५०) या दोघीही वर्णा (ता. राळेगाव) येथील शेतात काम करीत असताना वीज पडली. त्यात मंजुळा राऊत यांचा जागीच मृत्यू झाला, तर सौमित्रा अंबाडेरे जखमी असून त्यांच्यावर राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दोघीही निमगव्हाण (ता. कळंब) येथील रहिवासी आहेत. दारव्हा तालुक्‍यातील पाभळ येथील युवक हेमंत श्रीकृष्ण थरकडे हा लोणी शिवारात शेतात काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरू झाला. हेमंतने झाडाखाली आश्रय घेतला. त्या झाडावर वीज कोसळली. त्यात तो पूर्णपणे भाजला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याला उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. सुनील भवरे यांनी त्याला मृत घोषित केले, तसेच पांढरकवडा तालुक्‍यातील करणवाडी शेतशिवारात वीज पडल्याने पाच शेतमजूर गंभीर जखमी झाले. त्यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे उपचार सुरू आहेत. शोभा सुभाष चव्हाण (वय ३६), राहुल प्रकाश डेहणकर (वय २०) व मीराबाई रघुनाथ मांडवकर (वय ४०) व शिवदास तानबा दुधकोहळ (वय ३३), पुरुषोत्तम पंढरीनाथ डेहणकर, अशी जखमींची नावे आहेत. तर, नेर तालुक्‍यातील सिंदखेड येथील रणजित पवार वीज पडल्यामुळे जखमी झाला असून त्याच्यावर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बाणगाव येथील तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. विजांच्या कडकडाटाने यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील संगणकप्रणाली प्रभावित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्‍यातील खोडगाव येथील जगदीश झनकलाल नागपुरे हे पत्नी ममता व तीन मजुरांसह गांगला गावालगतच्या शेतात निंदण करण्यास गेले होते. पत्नी ममता व इतर महिला निंदण करत असताना जगदीश धुऱ्यावर बसून देखरेख करीत होते. याचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. बोरा येथील तेजलाल नागपुरे हे शेतातून घरी परत जात होते. दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून शेंडे नामक शेतकऱ्याच्या शेताजवळ नागपुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला