ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस गाठणार सरासरी

सामना प्रतिनिधी । पुणे

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मान्सून) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात देशात १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात कमी अधिक ८ टक्क्यांची तफावत शक्य असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. राज्यात पावसाने सध्या दडी मारली असून, हा अंदाज शेतकऱ्यांना सुखावणारा आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, १५ ऑगस्टपासून उर्वरित राज्यात पाऊस सुरु होण्याचा शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात कमी अधिक ९ टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याचा जून महिन्यात दिलेला अंदाजही कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हवामान विभागाकडील नोंदीनुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात १९५१ ते २००० या कालावधीमध्ये देशात सरासरी ४३.५ मिलीमीटर (हंगामातील एकूण पावसाच्या ४९ टक्के) पाऊस पडतो.

हवामान खात्याने प्रिन्सिपल कॉम्पेनट रिग्रेशन मॉडेल आणि मान्सून मिशन कपल्ड फॉरकास्टिंग सिस्टीम या मॉडेलच्या आधारे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज वर्तविला आहे. एल निनो, इंडियन ओशन डायपोल हे घटक सर्वसाधरण स्थितीत आहेत. यामुळे यंदा दुसऱ्या टप्प्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसात पडणारे खंड, वाढते उन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप यामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील खरीपाच्या पिकांवर परिणाम झाला आहे.

मराठवाडा, विदर्भात मोठी तूट

१ जून ते १२ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात २८९.६ मिलीमीटर (८८ टक्के) पाऊस झाला आहे. यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३० टक्के तर विदर्भात सरासरीपेक्षा २८ टक्के तुटीचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे. मराठवाड्यात २७९.६ मिलीमीटर (७० टक्के) विदर्भात ४४२.१ मिलीमीटर (७२ टक्के), मध्य महाराष्ट्रात ४९३.२ मिलिमीटर (१०४ टक्के) तर कोकणात २०८३.९ टक्के (९६ टक्के) पाऊस पडला. ऑगस्टच्या सुरवातीपासून पावसाने ओढ दिल्याचे पावसाची टक्केवारी घसरली आहे.