आठ दिवसांत मलेरिया 156, डेंग्यू 91, गॅस्ट्रो 474; पावसाळी आजारांचा ताप वाढला; अशी घ्या काळजी

पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून अवघ्या आठ दिवसांत मलेरियाचे 156, डेंग्यूचे 91 तर गॅस्ट्रोचे तब्बल 474 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. पावसाळी आजार वाढल्याने मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत या वर्षी पावसाने उशिरा एण्ट्री केली असली तरी सुरुवातीपासूनच पावसाळी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरात डेंग्यूचे 353, मलेरियाचे 676 तर गॅस्ट्रोचे तब्बल 1744 रुग्ण आढळले होते. ही वाढ कायम असून 1 ते 8 जुलैपर्यंत साथीचे आजार वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, जाँडीस असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळय़ासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

 कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येते. तरीदेखील सततच्या पावसामुळे आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे समोर येत आहे.

 या पार्श्वभूमीवर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

स्वाइन फ्लूही वाढतोय

z मुंबईत गेल्या महिनाभरात स्वाइन फ्लूचे (एच1एन1) 90 रुग्ण आढळले आहेत, तर जुलैमध्ये आठ दिवसांत 34 रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूची लागण झाल्यास ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलटय़ा, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळतात.

असे
आढळले रुग्ण

मलेरिया   – 156

लेप्टो – 29

डेंग्यू – 91

गॅस्ट्रो – 474

हिपेटायटीस     – 34

चिकुनगुनिया   – 5

स्वाइन फ्लू – 34