नरेंद्र मोदी हे खोटारडे पंतप्रधान,राज ठाकरे यांचं टीकास्र

65

सामना ऑनलाईन । वसई

देशात प्रचंड विकास झाला आहे, असे मोदी जगभर सांगत फिरत आहेत. पण ते सपशेल खोटं बोलत आहेत.  मोदी हे खोटारडे पंतप्रधान आहेत, अशी जोरदार टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वसईत केली.

वसईतील नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. या वेळी ते म्हणाले, भाजपने लोकांना जातीपातीत अडकवून महाराष्ट्र भडकवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. महाराष्ट्रात शिवरायांचा विचार मारण्याचा भाजपचा डाव आहे. या जातीच्या राजकारणामुळे बाहेरून आलेल्यांचे फावत आहे.

मोदींनी नोटाबंदी केली, कॅशलेस आणलं… मग भाजपकडे निवडणुकीत वाटण्यासाठी इतकी कॅश येते कुठून, असा सवाल करून राज ठाकरे पुढे म्हणाले, एटीएममध्ये नोटा संपल्यात, सरकार सांगतंय, नोटा छापण्याची शाई संपली आहे. हे काय वाण्याचे दुकान आहे काय? नोटा छापायच्याच होत्या तर कॅशलेस इंडियाची नाटके का केली?

नाणारच्या जमिनींवर गुजरात्यांचा कब्जा कसा?

नाणारमध्ये प्रकल्प येणार हे स्थानिकांना माहीत नव्हते, मग गुजरात्यांना आधीच कसे कळले? नाणारच्या जमिनीवर गुजरात्यांनी कब्जा कसा केला? तिथे प्रकल्प येणार आहे, जमिनी घ्या, असे त्यांना कोणी सांगितले, असा सवालही त्यांनी केला.

फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हगंदारीमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, फडणवीस बसवलेले मुख्यमंत्री आहेत. रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांसारखे ते बडबडत आहेत.  महाराष्ट्राचा वाळवंट होत असताना १ लाख विहिरी आणि ४ लाख शौचालये बांधल्याच्या थापा ते मारत आहेत. हगंदारीमुक्त महाराष्ट्र ही घोषणा सपशेल खोटी असून पाणीच नाही तर संडास बांधून उपयोग काय?

आपली प्रतिक्रिया द्या