कलाप्रेमींना राजा रविवर्मा यांच्या चित्रांची पर्वणी

सामना प्रतिनिधी । मुंबई

राजा रविवर्मा आणि त्यांनी काढलेली पौराणिक चित्रे म्हणजे कलेच्या प्रांतातील अनमोल ठेवाच जणू. हा ठेवा नेहरू सेंटरने रसिकांना खुला करून दिलाय. राजा रविवर्मा यांच्या चित्रप्रदर्शनाला रसिकांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे. तब्बल २० वर्षांनी वर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे. ६ जानेवारीपर्यंत रसिकांना हे प्रदर्शन खुले आहे.

राजा रविवर्मा यांची लक्ष्मी-सरस्वती, श्रीकृष्ण-राधा, दमयंती, मस्यगंधा याशिवाय विविध पौराणिक प्रसंग यावर आधारित चित्रे आता वस्तुसंग्रहालये आणि चित्र संग्राहकांकडे आढळतात. एकेकाळी ही चित्रे घराघरांत भिंतीवर विराजमान होती. अशी दुर्मीळ चित्रे कलाक्षेत्रातील नवोदितांनी अभ्यासता यावीत यासाठी नेहरू सेंटर आर्ट गॅलरीने ती २५ व्या इंडियन मास्टर्स रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांसमोर आणली आहेत. तब्बल १८० चित्रे आणि ओलिओग्राफ्स आहेत. वर्मा यांच्या चित्रांचे जतन करण्यासाठी ती ऑलिओग्राफ्समध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. त्यांचे जटायू वधाचे हे चित्र मूळ रूपात म्हणजे ऑइन ऑन कॅनव्हास आहे.

प्रदर्शनाची माहिती मिळताच विविध चित्र संग्राहकांनी आपल्या खजिन्यातील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीकडे आवर्जून पाठवली आहेत. रॉयल लेडी, श्री विठ्ठल रखुमाई, शकुंतलेचा जन्म ही ऑलियोग्राफ चित्रे तसेच कृष्णाची वाट पाहणारी राधा, शंतून मत्स्यगंधा, दमयंती, राधा-माधव ही चित्रे प्रदर्शनात आहेत.