अध्यक्षांची खुली निवडणूक होऊ द्या! राजन खान

सामना ऑनलाईन,मुंबई

राजकारण हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे लेखकाने राजकारणाला तोंड दिले पाहिजे. राजकारण हा शब्द वाईट नाही, फक्त एकमेकांना संपवण्याचे राजकारण वाईट आहे. एकगठ्ठा मतदानामुळे साहित्य संमेलन ही बदनाम प्रक्रिया झाली आहे. ती थांबली पाहिजे. त्यासाठी खुली संमेलन निवडणूक होऊ द्या, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केली.

बडोदा येथे होणाऱया ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार राजन खान यांचा आज मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालात वार्तालाप आयोजित करण्यात आला.  एका व्यक्तीच्या आग्रहासाठी अख्ख्या साहित्यसृष्टीचा बळी जातो. त्यामुळे सर्वांनी दबाव आणून एकगठ्ठा मतदान प्रक्रिया थांबवली पाहिजे, असे स्पष्ट मत खान यांनी व्यक्त केले. पोस्टाने, अॅपद्वारे मतदान होऊ शकते, असे त्यांनी सुचवले. निवडणुकीला उभी राहण्यामागची भूमिका सांगताना खान म्हणाले, अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्षपद ही मोठी जागा आहे. त्या पदाला जनमानसांत विशेष मोल आहे. अक्षर मानवच्या विविध उपक्रमांनी माणसे एकमेकांशी जोडून घेण्याचे काम केले. त्या कामांना अध्यक्षपदाच्या अस्तित्वाचे बळ मिळेल, भूमिका मांडायला व्यापक जागा मिळेल, ती सर्वदूर पोहचेल म्हणून मी उभा आहे.

होऊ द्या खर्च

साहित्य संमेलनासाठी होणाऱया खर्चावर ‘होऊ द्या खर्च’ अशी भूमिका खान यांनी घेतली. समाजाच्या प्रगल्भतेवर होणारा हा खर्च आहे. साहित्यसृष्टी जगली पाहिजे म्हणून केला जाणारा खर्च वाया जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेत पोट भरण्याची ताकद

इंग्रजीचा बागुलबुवा शिक्षणाच्या जीवावर पोट भरणाऱयांनी केलाय. मराठी भाषेच्या जीवावर पोट भरता येतं की… मराठीत आपले स्वतःचे पोट भरण्याची ताकद आहे, असे खान म्हणाले.