‘या’ तीन राज्यात भाजपची सत्ता जाणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसणार आहे. तर या तीन राज्यात काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता ‘एबीपी न्यूज’ आणि ‘सी वोटर’ यांनी केलेल्या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. या सर्वेच्या अंदाजानुसार या तीन राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट होण्याची शक्यता आहे. हे अंदाज खरे ठरल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

मध्य प्रदेश –

भाजपला बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील सर्वेक्षणानुसार 230 विधानसभेच्या जागांपैकी काँग्रेसला 117, भाजपला 106 तर इतरांना 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 42, भाजपला 40 तर इतरांना 18 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला 46, काँग्रेसला 39 आणि इतरांना 15 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवराजसिंह चौहान यांना 42, ज्यातिरादित्य शिंदे यांना 30 तर कमलनाथ यांना सात टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

छत्तीसगड –

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसला 54, भाजपला 33 तर इतरांना तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला 40 भाजपला 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी रमण सिंह यांना 54, अजीत जोगी यांना 17 तर भूपेश बघल यांना 9 टक्के लोकांनी पंसती दर्शवली आहे. तर लोकसभेसाठी भाजपला 46, काँग्रेसला 36 आणि इतरांना 18 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.,

राजस्थान –

राजस्थान विधानसभेच्या 200 जागांपैकी काँग्रेसला 130, भाजपला 57 आणि इतरांना 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 40, भाजपला 39 तर इतरांना 21 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 47, काँग्रेसला 43 आणि इतरांना 10 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.