‘हे’ बल्ब रोखणार ‘राजधानी’तल्या चोऱ्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी एक्सप्रेसमध्ये सोई-सुविधा आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राजधानी एक्सप्रेसमधील चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या वेळीही बल्ब लावले जाणार आहेत. याशिवाय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ही पाऊलं उचलण्यात येणार आहेत.

रात्रीच्या वेळी लावण्यात येणाऱ्या बल्बवर प्रवाशांचा कंट्रोल राहणार नाही. चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी रात्रभर हे खास बल्ब सुरू राहणार आहेत. या बल्बचा प्रकाश मात्र इतर बल्बपेक्षा कमी असणार आहे. याशिवाय ट्रेनच्या डब्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

तसेच ट्रेनमध्ये सजावटीसाठी आता ऐतिहासिक घटनांचे चित्रे लावण्यात येणार आहेत. पॅन्ट्रीमध्ये गॅस सिलिंडरचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी स्वच्छ टॉवेल आणि आरामदायक बिछाण्याची सोय करण्यात येणार असून टॉयलेट स्वच्छ ठेवण्याचीही सुविधा करण्यात येणार आहे.