केंद्राच्या मंजुरीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट नाहीच! : राजीव शुक्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे आज आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान पाकिस्तानविरुद्ध खेळणार का, असे विचारले असता क्रिकेट वर्ल्डकपला अजून अवकाश असून योग्यवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले.

जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करून विश्वचषकात पाकिस्तानशी खेळू नये!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून हिंदुस्थान -पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांना विचारले असता पाकिस्तानसोबत कोणतीही उभयपक्षी क्रिकेट मालिका न खेळण्याबाबतच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत असे शुक्ला यांनी सांगितले. दोन देशांमधील संबंध आणि खेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम कुणी करत असेल तर त्याचा खेळावरही निश्चितच परिणाम होतो, असे शुक्ला म्हणाले. पाकिस्तानसोबत सरकारच्या परवानगीशिवाय खेळायचे नाही, हे आमचे धोरण असून यात तसूभरही बदल झालेला नाही, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.