लेख : शाळेत चित्रकलेकडे दुर्लक्ष नको!

>>राजेंद्र प्रधान<<

राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांमध्ये झालेल्या अनाकलनीय बदलांमुळे आज असंख्य शाळांमध्ये चित्रकलेचे शिक्षक नाहीत हे फार कमी वाचकांना माहिती असेल. प्राथमिक वर्गांसाठी चित्रकला शिक्षक मिळणे फार पूर्वीपासूनच बंद झालेले आहे, पण गेल्या दोन वर्षांत माध्यमिक वर्गांसाठीही पूर्णवेळ चित्रकला शिक्षकाची नव्याने भरती केली गेलेली नाही. काही निवडक शाळांमध्ये तासिक तत्त्वावर शिक्षक नेमून चित्रकलेचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. शाळेच्या भिंती शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच चित्रं काढून रंगवाव्यात अशी एक कल्पना घेऊन शाळेत चित्रपतंग कला समूहाच्या सहकार्याने आम्ही एक उपक्रम राबवला.

विद्यार्थी-पालकांकडून जास्त फी उकळणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांना भक्कमपणे टिकायचं असेल तर गुणवत्तावाढीशिवाय दुसरा पर्याय नाही, पण याचा अर्थ फक्त दहावीचा निकाल चांगला लागणे किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षेत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवणे इतकाच मर्यादित नाही. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासेतर कलागुणांचा प्रसार होऊन त्यांना त्यात गोडी निर्माण करणे आज खूप आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासेतर कलागुणांच्या आधारेच बहुतेक विद्यार्थ्यांना त्यांच्या करीअर निवडीसाठी मदत होत असते.

गेल्या काही वर्षांत राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांमध्ये झालेल्या अनाकलनीय बदलांमुळे आज असंख्य शाळांमध्ये चित्रकलेचे शिक्षक नाहीत हे फार कमी वाचकांना माहिती असेल. प्राथमिक वर्गांसाठी चित्रकला शिक्षक मिळणे फार पूर्वीपासूनच बंद झालेले आहे, पण गेल्या दोन वर्षांत माध्यमिक वर्गांसाठीही पूर्णवेळ चित्रकला शिक्षकाची नव्याने भरती केली गेलेली नाही. काही निवडक शाळांमध्ये तासिक तत्त्वावर शिक्षक नेमून चित्रकलेचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. आम्ही मात्र अगदी वेगळाच पर्याय निवडला. त्याला निमित्त झालं २०१४ च्या बालदिनासाठी शाळेत आयोजित करण्यात आलेली भित्तीचित्रण कार्यशाळा. शाळेच्या भिंती शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच चित्रं काढून रंगवाव्यात अशी एक अभिनव कल्पना घेऊन शाळेत ‘चित्रपतंग कला समूहा’च्या सहकार्याने आम्ही एक उपक्रम राबवला. कामिनी आणि प्राची आगवणे यांच्या मार्गदर्शनाखालील या कार्यशाळेत वेगवेगळ्या इयत्तांमधील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि मुला-मुलींनी भिंती इतक्या सुरेख रंगवल्या की, त्यांच्यातील चित्रकलेला प्रोत्साहन देण्याचं आम्ही ठरवलं, अर्थात पालकांशी संवाद साधूनच.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्यास हीच कला त्यांच्या रोजगार निर्मितीचे साधन बनू शकते याची जाणीव आम्हाला होतीच, परंतु फार सुशिक्षित नसणाऱ्या पालकांना, विशेषतः धारावी-कुर्ला-चुनाभट्टी येथील निम्न आर्थिक वर्गातील पालकांना याची माहिती नव्हती. त्यांना कलेचं महत्त्व समजावं यासाठी आम्ही पालकांशी वेळोवेळी संवाद साधला. प्रभावी सादरीकरणांद्वारे परदेशांतील आणि आपल्या देशातील आदर्श शाळांत चाललेले कला उपक्रम आम्ही पालकांसमोर मांडले. त्यामुळेच पहिल्या वर्षी ७५, दुसऱ्या वर्षी १२५ आणि तिसऱ्या वर्षी २७५ विद्यार्थ्यांनी शाळेतील या चित्रकलेच्या उपक्रमाचा लाभ घेतला. पालकांना जसजसे या उपक्रमाचे महत्व पटत गेले, तसतसे विद्यार्थीसंख्या वाढत गेली.

‘एज्युकेशन फॉर क्रिएटिव्हिटी’हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम शाळा पातळीवर राबविणारी ‘चित्रपतंग’ ही राज्यातील बहुदा एकमेव बिगर सरकारी संस्था असावी. सर ज. जी. कला महाविद्यालयातून चित्रकलेचं औपचारिक शिक्षण पूर्ण केलेल्या आणि चित्रकलेतील प्रयोगशील उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीनिवास आगवणे या तरुणाच्या मार्गदर्शनाखालील ‘चित्रपतंग’चं एक व्यवच्छेदक वैशिष्टय़ हे की, कला शिक्षण देताना विद्यार्थ्यांच्या विचारांना आणि कृतीला पूर्ण स्वातंत्र्य देणं. शाळेतील लहान मुलांना एखादा विषय आवडतो तो त्या विषयाची शिक्षक तो विषय कसा शिकवतात यावरून हे भान बाळगत ‘चित्रपतंग’च्या टीमने कलाप्रवासात विद्यार्थ्यांचे बोट धरून त्यांना सोबत केली. विद्यार्थ्यांच्या मनात चित्रकलेची आवड कशी निर्माण होईल यासाठी हसत-खेळत मजा-धमाल करत विद्यार्थ्यांना रंगांच्या दुनियेची ओळख करून देण्यावर चित्रपतंगने भर दिला. विद्यार्थ्यांचं दृश्यभान विकसित करण्यासाठी फक्त ठोकळेबाज चित्रकलाच नव्हे तर फोटोग्राफी, शिल्पकला, फॅशन डिझायनिंग, प्रोडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फील मेकिंग अशा विविध पैलूंचाही ‘चित्रपतंग’ने विकसित केलेल्या डी. एस. हायस्कूलसाठीच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. मुलांना फक्त चार भिंतींमध्ये शिक्षण देण्यापेक्षा त्यांना खुल्या जगाचं दर्शन घडवण्यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे सर ज. जी. कला महाविद्यालय, जहांगीर कला दालन, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अशा कलामंदिरांना विद्यार्थ्यांच्या अभ्याससहली आयोजित करतो. कलाकारीचे विशेष गुण उपजतच अंगी असणाऱ्या निवडक शालेय मुलांना आम्ही शाळेतच ग्राफिक डिझाईनचा कोर्स उपलब्ध करून देणार आहोत, जो भविष्यातील रोजगार निर्मितीचे साधन बनेल.

आज शाळेत इयत्ता चौथीच्या चार तुकडय़ा, पाचवी, सहावी व सातवीच्या दोन तुकडय़ा आणि आठवी-नववी-दहावीची मिळून एक तुकडी अशी रचना करून विद्यार्थ्यांना चित्रपतंग कला संस्थेचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले गेले आहे. या चित्रकला प्रशिक्षणासाठी विद्यार्थी-पालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याचीही आम्ही दक्षता घेतली.

प्रत्येक शाळेत जशी विज्ञानाची स्वतंत्र प्रयोगशाळा गरजेची आहे त्याप्रमाणे स्वतंत्र कलावर्गही आवश्यक आहे. आम्ही सुमारे ५०० चौरस फुटांचा कलावर्ग विकसित केला. त्यात चित्रकला-हस्तकला यांसाठी सोयीचे ठरतील असे नवीन बाक बनवून घेतले. मुलांना रंगसाहित्य-कागद उपलब्ध करून दिला. शाळा दरवर्षी सुमारे ४० हजार रुपयांची रंगसाहित्य खरेदी करते आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते. शाळेतील या कलावर्गाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते झाले. त्यांनीही या उपक्रमाची प्रशंसा केली. ‘चित्रपतंग’ कला संस्थेसोबत डी. एस. हायस्कूलमध्ये राबवल्या गेलेल्या चित्रकला अभ्यासक्रमाद्वारे मराठी शाळांची कात टाकणाऱ्या या उपक्रमाला सर ज. जी. कला महाविद्यालय या कलेच्या माहेरघरातून नेहमीच सहकार्याचा प्रतिसाद मिळतो.

(लेखक शिव शिक्षण संस्था, शीव संचालित डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष आहेत.)