राजेश मापुसकर उलगडणार दादासाहेब फाळकेंची महत्त्वाकांक्षा!

2

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ६४ वा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले दिग्दर्शक राजेश मापुसकर आता लवकरच हिंदुस्थानी चित्रपटांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळकेंना श्रद्धांजली अर्पण करीत ५५ सेकंदांचा लघुपट दिग्दर्शित करणार आहेत.

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेचं दादासाहेब फाळके, एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व. चलचित्रांच्या माध्यमातून सगळ्यांनाच अवाक करणारा हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण करून फाळकेंनी हिंदुस्थानी सिनेमांची बीजं रुजवली. ज्यामुळे आज एक मोठी सिनेसृष्टी उभी राहिली आणि म्हणूनच आज फक्त हिंदुस्थानच नाही तर सारं जग दादासाहेबांना सलाम करत आहे.

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंवर आधारित ह्या लघुपटाची संकल्पना आणि लेखन राजेश मापुसकर यांनी स्वत: केलं असून या लघुपटाच्या दिग्दर्शनाच्या संधीविषयी बोलताना राजेश मापुसकर म्हणाले, “जेव्हा पहिल्यांदा मला या लघुपटाच्या दिग्दर्शनाबाबत विचारलं गेलं तेव्हा मला खूप आनंद झाला. एका क्षणाचाही विलंब न करता लगेच मी माझा होकार कळवला. हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित हा लघुपट बनवायची संधी मला मिळाली आहे.” लवकरचं ह्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून मी त्यासाठी खूपचं उत्सुक असल्याचंही ते म्हणाले.