अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मोकळे करा!

>>राजेश वैद्य<<

शिक्षकांची संकल्पना अलीकडे झपाटय़ाने बदलत चालली आहे. शिक्षकाचा अध्यापन व विद्यार्थी सर्वांगीण विकास तसेच गुणवत्ता वाढीस लावण्याचा मूळ हेतूच हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकापाठोपाठ एक निघणारे आदेश, मग ते online portal बाबतचे असो किंवा online  बदल्या, विविध दिन शाळांत साजरे करणे असो किंवा विविध अभियाने असो हे सर्व अशैक्षणिक उपक्रम राबवा व त्याचे फोटोसह अहवाल तयार करा. या सर्व बाबींची पूर्तता फक्त आणि फक्त what’s app च्या द्वारा पाठविलेल्या रात्री-अपरात्री संदेश वा परिपत्रक/शासन निर्णयाने होत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची मुजोरीही वाढत आहे. यात भरडला जातोय शिक्षक. यामुळे समस्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक प्रचंड त्रासलेला आहे. एकीकडे अशैक्षणिक कामांचा ससेमिरा सुरू ठेवायचा व दुसरीकडे महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी गुणवत्तेचा ध्यास धरायचा हे परस्पर विसंगतीयुक्त आहे. अशाने का विद्यार्थी गुणवत्ता वाढणार आहे? प्रगत महाराष्ट्र होण्यासाठी अशैक्षणिक कामांचा ससेमिरा थांबवा. शिक्षकांना वर्गात शिकवू द्या. विद्यार्थी वर्गास भयमुक्त शिक्षण देणारा शिक्षक स्वतः मात्र भयग्रस्त झालेला आहे. सातत्याने तणावाखाली वावरत आहे. एसी केबिनमधून बसून महाराष्ट्राचे ध्येयधोरण राबविणाऱ्या सनदी बाबूंच्या अतिआहारी जाऊन महाराष्ट्र प्रगत होणार नाही. प्रत्यक्षात तळागाळातील गाव, खेडी, शहरी भागातील झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी वर्ग यांचा विचार करून ध्येयधोरणे आखली गेली पाहिजे. मनात ती अभियाने व दिन राबवून का विद्यार्थी गुणवत्ता उंचावणार आहे? वेठबिगारासारखे शिक्षकांना वागविण्याची मानसिकता बदला. अमक्या नेत्याचा व मंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शिक्षकांना बळीचा बकरा बनवू नका. प्रसारमाध्यमांनी निव्वळ शासनाची वा शिक्षण विभागाची बाजू न मांडता शिक्षकांची न्याय्य बाजू मांडली पाहिजे.