राजकारणातील एन्ट्रीनंतर ‘थलैवा’ची वेबसाईट लॉन्च

सामना ऑनलाईन । चेन्नई

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुपरडुपर रजनीकांत यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली होती. राजकारणातील एन्ट्रीनंतर थलैवाने सोमवारी आपली वेबसाईट लॉन्च केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना, ‘ऑल इंडिया रजनीकांत फॅन्स असोसिएशन’मध्ये सदस्यत्वाची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

माईंड इट! रजनीकांत यांची राजकारणात एन्ट्री

रजनीकांत यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून वेबसाईट लॉन्चची घोषणा केली. ‘राजकारणामध्ये प्रवेश करण्याच्या माझ्या घोषणेनंतर चाहत्यांनी आणि राज्यातील नागरिकांकडून मिळालेल्या अभिनंदनाच्या वर्षावामुळे मी भारावून गेलो आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांना धन्यवाद देतो. मी माझ्या चाहत्यांना आवाहन करतो की त्यांनी माझ्या वेबसाईटवर (www.rajinimandram.org) आपले नावाची नोंदणी करावी. चाहत्यांसोबत ज्या लोकांना चांगल्या राजकीय स्थितीची अपेक्षा आहे त्यांनीही आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन रजनीकांत यांनी केले आहे. तसेच लोकांनी या वेबसाईटवर लोकांनी आपल्या मतदार नंबरचीही नोंद करावी, असे रजनीकांत म्हणाले.

याआधी रजनीकांत यांनी चेन्नई येथील राघवेंद्र कल्याण मंडपम येथे चाहत्यांशी संवाद साधताना राजकीय पक्षस्थापनेची घोषणा केली होती. तसेच राजकीय पक्षाची स्थापना करून तमीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीत २३४ जागांसाठी लढणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. रजनीकांत यांच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे तमीळनाडूमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.