राजीव शुक्लांच्या त्या सहाय्यकाचा राजीनामा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘आयपीएल’चे चेअरमन राजीव शुक्ला यांचा कार्यकारी सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफी याने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. संघनिवडीच्या बदल्यात शरीरसुखासाठी मुली पुरविण्याची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यस्तरीय संघात खेळाडूंची निवड करण्याच्या बदल्यात सैफीने ही घृणास्पद मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्याने पदाचा राजीनामा दिला असला तरीही माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत असा पुनरुच्चार त्याने केला आहे.

उत्तर प्रदेशमधील स्थानिक वृत्तवाहिनीने बुधकारी यासंबंधीचे वृत्त प्रसारित केले होते. या वृत्तानुसार अक्रमने राहुल शर्मा या खेळाडूला संघातील निवडीबाबत लाच किंवा मुली पुरविण्याची मागणी केली होती. तसेच बीसीसीआयच्या विविध वयोगटातील स्पर्धांसाठी अक्रम खेळाडूंना बनावट वय प्रमाणपत्र पुरवण्यासही मदत करत असल्याचा आरोप राहुलने केला आहे. त्या वृत्तवाहिनीने अक्रम याची एक रेकॉर्डेड फोन टेप प्रसारित केली.