राज्यांनी रोहिंग्यांवर लक्ष ठेवा, पसरू देऊ नका- राजनाथ सिंह

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रोहिंग्यांच्या प्रश्नावर लोकसभेत निवेदन देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. रोहिंग्यांना राज्यात पसरू देऊ नये, तसेच त्यांना देशाबाहेर हकलण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘बांग्लादेशातून रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच सर्व राज्यांना सल्ला देण्यात आला आहे की, आपापल्या राज्यात आधीच शिरलेल्या रोहिंग्यांवर लक्ष ठेवा, त्यांना एकाच ठिकाणी ठेवा अन्य ठिकाणी पसरू देऊ नका. तसेच त्यांना देशाबाहेर हकलण्याचे अधिकार राज्यांना आहेत’, असे निवेदन त्यांनी लोकसभेत दिले.

दरम्यान, याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी देखील रोहिंग्या संदर्भात भूमिका मांडली होती. ‘रोहिंग्या मुसलमान देशात अवैधपणे राहत असून त्यांना हिंदुस्थानात जास्त काळ राहू देणार नाही. त्यांनी देशात हातपाय पसरून स्थायिक होण्याआधी त्यांना देशातून बाहेर काढण्यात येईल’, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.